30.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ भाजी विक्रेत्या महिलांचा शौचालयासाठी मुख्याधिकार्‍यांसह नप अध्यक्षांना निवेदन

भाजी विक्रेत्या महिलांचा शौचालयासाठी मुख्याधिकार्‍यांसह नप अध्यक्षांना निवेदन

0
50

गोंदिया,दि.07ःशहराची बाजारपेठ ही मोठी असून शेकडोच्या वर भाजी विक्रेत्या महिला व्यवसाय करतात. मात्र, शौचालय व लघुशंकेसाठी कुठलीही व्यवस्था परिसरात नसल्याने महिलांसह पुरुषांनासुध्दा त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात सावित्रीबाई फुले भाजी विक्रेता संघातर्फे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देऊन त्वरित शौचालय व लघुशंकागृहाची मागणी केली आहे. अन्यथा नगर परिषदेसमोर यासाठी आंदोलन करण्यात येईल व पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे संघाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
‘अ’ दर्जा असलेल्या गोंदिया नगर परिषदेला अनेक घोटाळे व अव्यवस्थेने ग्रासले आहे. दरम्यान, भाजी विक्रेत्या महिलांनी या नगर परिषदेची आता पोलखोल केली आहे. शहरातील भाजी बाजार अतिव्यस्त ठिकाण असून मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असते.
बाजारात महिलांना विशेषत: विक्रेत्या महिलांना शौचालय व लघुशंकागृह नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होते. बाजारातील गर्दीमध्ये आडोसा शोधावा लागतो. दरम्यान, येथील रहिवासी त्यांच्यावर अस्वच्छता पसरवित असल्याच्या कारणावरुन घाणेरडे पाणी किंवा गरम पाणी फेकण्याचे प्रकार होत आहे. ही समस्या वाढल्याने त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे आता भाजी विक्रेत्या महिलांपुढे आंदोलनाशिवाय मार्ग नसल्याने त्यांनी सांगितले. ही समस्या फक्त बाजारातील व्यावसायीकांची नसून ग्राहकांची सुध्दा आहे. नगर परिषद या विक्रेत्यांकडून दररोज कर घेते, मात्र सुविधा काहीच नाही. यासंदर्भात त्या आमदार व खासदार यांना भेटून समस्या सोडविण्याचे निवेदन देणार असल्याचे सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्वच्छतेसंदर्भात व महिलांना होत असलेल्या समस्याचे निवेदन पाठविणार असल्याचे संघाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.
यावेळी संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार लिल्हारे, सचिव राजू नागरीकर यांच्यासह गीता कटरे, अंजू अगडे, राजवंती मस्करे, विमला भावे, हेमलता हरिणखेडे, पुनम वराडे, बिजली कावरे, लयसर चौधरी, चित्रीकला दादरे, तुलसा डोहरे, पपिता बिजेवार, इंदू रहिले, सुनीता गायधने, सविता धुवारे, भूमिता राऊत, कविता चौरागडे, ओमप्रकाश जांभूळकर, सुरेश डोहरे, पंकज राऊत, सुभाष बोरकर, राजेश गायधने, प्रदिप सेलोकर, मंजू राऊत आदी उपस्थित होत्या

blank