25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ प्रतिकुल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य- गृह मंत्री एकनाथ शिंदे

प्रतिकुल परिस्थितीतही प्रशासनाचे काम स्तुत्य- गृह मंत्री एकनाथ शिंदे

0
36

गडचिरोली,दि.23:-नक्षल चळवळीमुळे जिल्हयातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता अशा प्रतिकुल परिस्थितही जिल्हा प्रशासन सर्वंकष योजनांची अंमलबजावणी करुन विकास कामे गतीने करीत असल्याचे निदर्शनास आले असून ते स्तुत्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.जिल्हा पोलीस मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते.  यावेळी उप पोलिस महानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोहीत गर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, जिल्हयात नक्षल चळवळीत येथील स्थानिक युवकांचा समावेश आहे.  अशा भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत. नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जिवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याचीही दक्षता घेण्यात येत आहे.  युवकांना प्रशिक्षण देण्यापासून तर आर्थिक मदत सुध्दा प्रदान करण्यात येत आहे. यामुळे विकासाच्या  मुख्य प्रवाहात युवकांना आणणे आता अडचणीचे ठरणार नाही. जिल्ह्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी रोजगाराची निर्मिती करणे काळाची गरज असून याशिवाय युवक मुख्य प्रवाहात येणार नाही.  शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विद्युत, कृषिवर आधारित उद्योग यावर भर देण्यात येईल असेही ते म्हणाले.

जिल्हयात सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देतांना मोठया प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करुन सिंचनाची सोय करुन देण्याचा शासन विचार करीत आहे.  सोबतच शेतात उत्पन्न झालेल्या धान्याला योग्य भाव मिळेल अश्या आधारभूत किंमती निश्चित करण्यात येतील. बिआरओ च्या कामाप्रमाणे  प्रलंबित राहीलेल्या तस्त्यांची/ पुलांची  कामे प्राधान्याने पुर्ण करुन दळणवळण व्यवस्था चांगली करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हणाले.

ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी  मुख्यालयी राहून सेवा देण्यासाठी त्यांना विशेष भत्ता देण्यात येईल आणि एक विशेष बाब म्हणून वैद्यकीय अधिकारी यांची  नियुक्ती करण्यावर भर देण्यात येईल.  तसेच कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी पोलिस विभाग पोलीस भरती लवकरच करणार असून याकरीता स्थानिक युवकांना प्राधान्य देणार असल्याचे गृह मंत्री शिंदे यांनी  सांगितले.गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकवर पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवांनाना आदरांजली वाहीली.