भंडारा,दि.03 : दरवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो नागरिक बेघर होत असतात अशा नागरिकांना घरकुल प्रतिक्षा यादीत प्राधन्यक्रम द्यावा अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. भंडारा तालुक्यातील गोपीवाडा येथील गजानन गभने यांच्या घराला गॅस सिलेंडरच्या भडक्यामुळे आग लागल्याची घटना २८ डिसेंबरला घडली. यात भाडेकरू असलेले बालचंद शेंडे यांचे अन्नधन्य, कपडे, भांडे, जळून खाक झाले यात त्यांचे १,८६,००० रूपयाचे नुकसान झाले. तर घरमालक गजानन गभने यांचे घराचे ८५,५०० रुपयाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार नरेद्र भोंडेकर यांनी घटनास्थळाला भेट देवून तातडीने शासकिय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण जिल्ह्यातील दरवर्षी अतिवृष्टीमुळे अथवा आगीमुळे घरे कोसळतात, यामुळे शेकडो नागरीक बेघर होत असतात. अशा बेघर झालेल्या नागरिकांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ मिळावा, प्रतिक्षा यादीची अट ठेवू नये या माणीसाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटले आहे.





