भंडारा,दि.04ःःतीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले हजारो क्विंटल धान पाण्यात भिजले. काही धान अंकुरले. तरीसुद्धा जिल्हा पणन विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पणन विभागाच्या निष्क्रिय अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे व धान मिलींगचे आदेश तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले.यावेळी शिवसेना पदाधिकारी अनिल गायधने, बाळू फुलबांधे, विजय काटेखाये, प्रकाश मेर्शाम, मुकेश थोटे, राजू ब्राह्मणकर, नरेश बावनकर, नरेश उचिबगले, नामदेव सुरकर, राजेश सार्वे, यशवंत पंचबुधे, पुरुषोत्तम टेंभरे आदी उपस्थित होते
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धानाला सातशे रुपयांचा बोनस जाहीर केला. त्यामुळे हजारो शेतकर्यांनी आपले धान आधारभूत केंद्रावर आणले. परिणामी, केंद्रावर धानाची आवक वाढली. धान खरेदी केंद्र वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी देवूनसुद्धा अधिकार्यांनी गंभीरतेने घेतले नाही. तथापि, अवकाळी पावसाने खरेदी केंद्रातील अव्यवस्थेमुळे लाखो क्विंटल धानाची नासाडी झाली आहे. ही बाब अनेक शेतकर्यांनी डोळ्यात अर्शु आणून आ. भोंडेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याचा निषेध करण्यासाठी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकर्यांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन केले.
अधिकारी व व्यापारी मिळून शेतकर्यांची लूट करण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात सुरु आहे. शेतकर्यांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकार्यांना तात्काळ निलंबित करावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी ठप्प असून खरेदी केंद्रासमोर पडलेला लाखो क्विंटल धान सडला आहे. याला जिल्हा पणन अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी जबाबदार असून या दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनामार्फत करण्यात आली.





