26.9 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home शैक्षणिक एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजन

एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजन

विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम

0
192

मुंबई, २७ मार्च- देशासह राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटकालिन परिस्थीतीत विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील नियोजीत कार्यक्रम, परिषदा, चर्चासत्रे पुढे ढकलण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता मुंबई विद्यापीठाचे  तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील पुर्वनियोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन मात्र वेगळ्या पद्धतीने होत आहे. यासाठी महाविद्यालयाने झूम एप्लीकेशनच्या माध्यमातून ही परिषद आभासी पद्धतीने घ्यावयाचे ठरविले आहे. २९ मार्च २०२० रोजी ही परिषद आयोजित केली जाणार असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत, वॉटरमॅन ऑफ इंडिया श्री राजेंद्र सिंग, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, यांच्या उपस्थित या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उदघाटन होणार आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘विश्वनाथ समिट’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित होत असलेल्या या परिषदेची ‘मॅनेजमेंट ऑफ एक्वेटीक हेल्थ अँड रिसॉर्सेस ऑफ कोकण विथ स्पेशल एम्फेसिस ऑन सिंधुदूर्ग’ ही संकल्पना आहे. राज्यातील जवळपास पन्नासहून अधिक प्राध्यापक, विशेतज्ज्ञ या परिषदेत आभासी पद्धतीने संशोधनपर सादरीकरण करणार आहेत. परिषदेतील मार्गदर्शक, संशोधक, सहभागी व्यक्तिंना तंत्रज्ञानाच्या मदतीने व झूम एप्लीकेशनच्या सहाय्याने प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे ऑर्गनायझिंग समितीचे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांनी सांगितले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४००० मिमी. पाऊस पडतो, मात्र उन्हाळ्यात याच जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे अरिष्ट गेल्या अनेक वर्षापासून कोकणातील अनेक भागात जाणवत आहे, आणि हे असेच जर सुरू राहिले तर कोकणातील नैसर्गिक साधन संपत्तीसह काजू, आंबा, नारळ यासारख्या पिकांना मुकावे लागणार असल्याचे अनेकांनी सांगून ठेवलं आहे. त्यामुळे वेळीच याला पायबंद घालण्यासाठी व या भीषण प्रश्नांची उकल करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने सिंधू स्वाध्याय संस्थेच्या अंतर्गत जल आणि मृदा संवर्धनाचे प्रारुप तयार केले असून या अंतर्गत अनेक उपक्रमांना सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर या एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून कोकणातील लोकांना जलयोध्दा म्हणून पुढे येण्यासाठी पाण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा. विनायक दळवी यांनी सांगितले.