सडक अर्जुनी,दि.07ः तालुक्यातील खोडशिवणी येथील ग्रामपंचायत व्यापार संकुलांमधील एका टेलरिंग दुकानाला 6 मे च्या रात्री 2 वाजेच्या सुमारास आग लागल्याने सुमारे 1 लाख 68 हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली.ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.दुकानातील सर्व साहित्य जळालाने दुकानमालक टेलर भोलानाथ बावनकर यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लाॅकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून हे दुकान बंद होते.या व्यापारी संकुलात दहा दुकाने आहेत.त्यापैकी बावनकरांच्या टेलरिंग दुकानाला 6 मे रोजी रात्री 2.00 वाजेच्या सुमारास आग लागली.आग लागल्याने दुकानातून धुर निघत असल्याचे सुरेश कवरे व घनश्याम वरकडे यांना दिसताच ताबडतोब विद्युतपुरवठा बंद केला. मात्र तोपर्यंत या टेलरींग दुकानातील दोन शिलाई मशीन, 200 नग कपड्यांचे ड्रेस, पंखा, अलमारी व इतर साहित्य असे एकूण 1 लाख 68 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते.कवरे वरकडे यांच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली गेली.तलाठी व पोलीस पाटील यांनी सदर जळीत दुकानाचा पंचनामा करून तहसीलदार सडक अर्जुनी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे. तसेच विद्युत विभागाच्या वतीने देखील घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. जळीत दुकानाचे मालक भोलानाथ बावनकर हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांचा उदरनिर्वाह या टेलरिंग व्यवसायावरच अवलंबून होता. अगोदर लॉकडाऊन त्यानंतर दुकान जळाले. त्यामुळे मोठे आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. तरीपण शासनाच्या वतीने यांना ताबडतोब मदत देण्यात यावी, अशी मागणी खोडशिवणी वासियांनी प्रशासनाला केली आहे.





