
चामोर्शी,दि.20ः तालुक्यातील पावीमुरांडा नियतक्षेत्रातील वनखंड क्रमांक १३ च्या वनक्षेत्रात पांढरी भटाळ या गावातील लोकांनी अवैधरित्या निलगायीची शिकार करून मांस घरी बाळगल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार १६ मे रोजी पावीमुरांडा या नियतक्षेत्रातील वन खंड क्रमांक १३ च्या वनक्षेत्रात पांढरी भटाळ या गावातील इसमांनी निलगायीची शिकार करून मांस कापून स्वत:जवळ बाळगल्याची गुप्त माहिती कुनषाडा येथील वनपरिक्षेत्राधिकारी महेश शिंदे यांना मिळाली. यावरून पावीमुरांडाचे क्षेत्रसहायक सुरेश गव्हारे, कुनघाडाचे क्षेत्रसहायक एस. एम. मडावी यांना देवून चौकशी करण्याची सूचना दिली. त्यावरून त्यांच्या अधिनस्त वनरक्षक प्रकाश कोराम, संदीप आंबेडारे, नांगसू गोटा, मोटघरे, मोगरे हे आपल्या सहकार्यासह पांढरीभटाळ गावात गेले असता धनू राजीराम जाधव यांच्या घरी वन्यप्राण्याचे मांस असल्याची माहिती मिळाली. वनकर्मचार्यांनी जाधव यांना विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करीत वन्यप्राण्यांचे मास नसल्याचे सांगितले. वनकर्मचार्यांनी पंचासमक्ष घराची चौकशी केली असता स्वयंपाक घरात एका वाट्यात वन्यप्राण्याचे मांस आढळून आले. सदर मास ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना धनु जाधव याचा मुलगा दारूच्या नशेत येवून सदर मांस जबरीने घेऊन घराच्या बाजुला असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला व तो पसार झाला.
याबाबतची माहिती वनकर्मचार्यांनी भ्रमणध्वनीवरून वनपरिक्षेत्र अधिकार्यांना दिली असता त्यांच्या सुचनेनुसार धनू जाधव या इसमास चौकशीकरिता बोलावून विचारणा केली असता आपण स्वत: व सोबत हिराचंद मनिराम जाधव, उत्तम धनू राठोड हे आपट्याच्या साडाचे वाक खोदून आणण्यासाठी कुन्हाड घेऊन सकाळी जंगलात गेलले असता जंगलात कुत्र्याने पाठलाग केल्याने पायाला जखमी निलगाय जंगलात आढळली. तीला ठार करून गावाजवळील नाल्यात आणले व कापून मांस बनविले. या कामात भाऊराव आनंदराव पवार, सदूसिंग अमरसिंग पवार, जागेश्वर महादेव लेखामी, विजय बापू गावडे, सुरेश रूषी मट्टामी यांनी सहकार्य केल्याचे सांगितले.
वनाधिकार्यांनी मौका पंचनामा करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)(आय) व वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमान्वये भादंवि कलम १४९ नुसार आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





