34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आणि चौकशी अहवाल झाला गहाळ . . . !

आणि चौकशी अहवाल झाला गहाळ . . . !

8 महिन्यापासून चौकशी अहवाल तयार होतोय मोहाटोला तलाव खोलीकरण प्रकरण

0
379

सालेकसा,दि.28ः तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहाटोला गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. ग्रामस्थांनी या कामावर बोगस हजेरी लावत 60 मजुरांचे नावे हजर नसताना जोडून त्यांच्या नावे दीड लाख रुपये उचलल्याची तक्रार केली होती. विशेष म्हणजे मोका चौकशी दरम्यान असे कोणतेही काम झाले नसून बोगस मजुरांची नावे टाकून शासनाच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली गेली होती. या तक्रारीवर कार्यवाही करत सालेकसा तहसिलदार सी.जी.पित्तुलवार यांच्या आदेशाने 4 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली.त्यानुसार खंड विकास अधिकारी, नायब तहसिलदार ए. बी. भुरे यांच्या उपस्थितीत मोका चौकशी करण्यात आली होती. त्या आधारावर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु आज आठ महिने होऊन सुद्धा चौकशी अहवाल तयार झालेला नाही. संबंधित अधिकारी चौकशी अहवाल तयार करण्यास विविध कारण सांगून टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर कामांमध्ये कदाचित शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्याही समावेश असावा असा संशय केला जात आहे. या कामात घोटाळा असेल म्हणूनच अहवाल सादर करण्यात उशीर केला जात असल्याचे बोलले जात आहे. या कामावर दाखवण्यात आलेली काही नावे ही सदर ग्राम पंचायत हद्दीतील नसल्याचेही समोर आले आहे. मनरेगाच्या नियमानुसार ग्राम पंचायत हद्दीबाहेरील कामगारांना कामावर घेता येत नाही. तरी देखील या कामावर काही नावे आढळून आले आहेत.तर जे शहरात रोजगारासाठी जाऊन वर्षे झाले तरीही ते कामगार हजर असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या चौकशी अहवालकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

चौकशी अहवाल तयार करण्यासाठी 4 सदस्याची चमू तयार केली गेली होती, त्यांच्या माध्यमाने अहवाल तयार केला जाणार होता. आमच्या कार्यालयाला अद्याप अहवाल मिळाला नाही.”  जयप्रकाश बोरकर विस्तार अधिकारी , पंचायत समिती, सालेकसा

blank