अर्जूनी/मोर(संतोष रोकडे)दिं.30. तालुक्यातील भुरसीटोला येथील तलाठी साझा क्रमांक 3 मधील खासगी जागेतील गट क्रमांक 6 मधील 0.50हेक्टर आर जागेमधून 1 हजार ब्रास मुरुमाचे उत्खनन करुन वाहतुकीची परवानगी लाखनीतील शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीला उपविभागीय अधिकारी यांनी दिली होती.मात्र परवानगीपेक्षा अधिक 2292 ब्रास मुरुमाचे उत्खनन करुन वाहतुक केल्याप्रकरणी तसेच वाहतुकपरवान्यात खोडतोड केल्याप्रकरणात शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीवर अर्जुनी मोरचे तहसिलदार विनोद मेश्राम यांनी कारवाई करीत 1 कोटी 10 लाख 64 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम शासन जमा करण्याचे आदेश शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर( हल्ली मुक्काम नवेगावबांध) यांना 27 मे रोजी दिले आहेत.
प्राप्त माहिती नुसार,अवैध गौण खनिज उत्खननाची तपासणी करीत असताना नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांना शिवालया कंट्रक्शन कंपनीचे अतुल सुधाकर डोर्लीकर यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक एएस.डी.1,एफसी 926 मध्ये टिप्पर चालक लालदेव शिवालया कन्ट्रक्शन कंपनी कॅम्प नवेगाव बांध यांने 24 मे रोजी सायंकाळी 4.50 वाजता मुंगली येथे वाहतुक परवान्यावर खोडतोड करुन 2292 ब्रास मुरूम अवैधरित्या पोखलँंडद्वारे उत्खनन करुन वाहतूक करीत असतांना आढळले.त्यामुळे नायब तहसिलदार गेडाम यांनी सदर वाहन जप्त करून तहसील कार्यालय येथे जमा केले.कारवाईत पोखलँंडमशीनद्वारे खोदकाम केल्याने 7 लाख 50 हजार रुपये तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) अन्वये प्राप्त अधिकाराचा उपयोग करून कलम 42 (7) अन्वये अवैधरित्या टिप्पर मधून गौण खनिज वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार विनोद मेश्राम यांनी ठोठावला.तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2015 च्या कलम 48 (7) तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांचे 11 नोव्हेंबर 2016 अन्वये निर्गमित पत्रानुसार उत्खनन केलेल्या खनिजाच्या बाजार भावाच्या पाच पट दंडाची रक्कम व व स्वामित्व धन याप्रमाणे 2292 ब्रास मुरुमाचे बाजार भाव 900 रुपये प्रमाणे पाचपट 1 कोटी 3 लाख 14000 हजार रुपये अधिक स्वामित्वधन असे एकूण 1 कोटी 10 लाख 64 हजार रुपयांचा दंड आकरण्यात आला.
शिवालया कन्स्ट्रक्शन कंपनीला 1 कोटी 10 लाख 64 हजाराचा दंड
अर्जुनी मोरगावचे तहसिलदार मेश्राम यांची कारवाई





