
वर्धा,दि.6जूनः शहराच्या तारफैल भागातील एका आठ वर्षीय बालकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडल्याने खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे आज राज्याच्या गृहमंत्र्यांचा वर्धा जिल्हा दौरा असतानाच ही घटना घडल्याने चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.सदर बालकाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. घटनेमुळे रात्री संतप्त नागरिकांनी वर्धा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत संताप व्यक्त केला.गृहमंत्री पहिल्यांदाच येत असून त्यांच्या येण्यापूर्वीच आदल्याच दिवशी हत्येसारखा मोठा गुन्हा समोर आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.हत्येच्या घटनेमुळे वर्ध्यात तणाव निर्माण झाल्याने रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम तैनात करण्यात आली आहे. रात्री ही घटना उघडकीस आली. मृतावस्थेत आढळलेला बालक शेजारच्याच एका युवकासोबत फिरायला गेल्याचे दिसले होते.त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी संशयातून त्याला झोडपून काढले. त्यामुळे या संशयित युवकास सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बालकाचा गळा दाबून खून करीत त्याला पाण्याच्या पाण्याच्या टाकीत फेकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संतप्त नागरिकांनी वर्धा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला असून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





