गोंदिया,दि.06ः-विविध युटूब चॅनलकरीता काम करणारे पत्रकार व छायाचित्रकार सतिश पारधी यांच्या घरासह मुलाच्या घरावर 4 जून च्या रात्री 12 वाजेच्या सुमारास पोलिसांच्या एका पथकाने अचानक भेट दिल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.पत्रकार सतिश पारधी यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह गृहमंत्री व मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवित कुठलाही तपास आदेश नसतानाही रात्रीबेरात्री आपल्या कृष्णपुरा वार्डातील घरावर व मुलगा ज्याठिकाणी भाड्याने वास्तव्यास असतो त्याठिकाणी जाऊन मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे.एकीकडे करोनापार्श्वभूमिवर संचारबंदी सुरु असल्याने कुणीही कुठे जाऊ शकत नाही,मात्र पोलीस यागोष्टीचा गैरफायदा घेत दहशत निर्माण करुन घराचा दार जोरजोराने ठोठावत होते.जोरजोराने दार ठोठावल्याने झोपेत असलेल्या आपल्या सुनेने व मुलगा सन्नीने दार उघडून पोलिंसानाच ही काय पध्दत आहे त्रास देण्याची असा प्रतिप्रश्न करताच चारचाकी वाहनाने गेलेले पोलीस परतले.त्यावेळी त्यांच्यासोबत एकही महिला पोलीस नसल्याचेही त्यांचे म्हणने आहे.त्यातच वरच्या रुममधून खाली येत असताना आपला मुलगा सचिन पोलीसांच्या या गैरप्रवृत्तीमुळे पायर्यावरुन खाली पडल्याने त्याच्या पायाला व डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तर सतिश पारधी यांच्या सुनेने याप्रकरणात रात्रीच्यावेळी घरी येत दडपशाहीने त्रास देणार्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रमोद घोंगे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की,देवरी पोलिसांना सन्नी पारधीचा एका प्रकरणात तपास करावयाचा असल्याने तेथील अधिकारी व पोलीस आलेले होते.त्यांच्यासोबत फक्त आपला स्थानिक क्षेत्रातील व्यक्ती असल्यामुळे पोलीस कर्मचारी गेलेला होता,कुठल्या प्रकरणात सन्नी पारधी हवा होता हे देवरी पोलिसांकडेच माहिती मिळू शकेल असे सांगितले.





