
गोंदिया दि.14 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आला आहे. आज 14 जून रोजी प्राप्त अहवालावरून हा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.हा रुग्ण 30 ते 40 वर्ष वयोगटातील असून तो तिरोडा तालुक्यातील आहे.
जिल्ह्यात आता क्रियाशील बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली असून सलग तीनही दिवशी सापडलेले रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील असून ते दुबई येथून जिल्ह्यात आले आहे.
चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात दुबई येथून तीन दिवसांपूर्वी आलेल्या व्यक्तींपैकी सलग तिसरा रुग्ण सुद्धा बाधित आढळला.
26 मार्चला पहिला रुग्ण बाधित आढळल्यानंतर सलग 39 दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता.त्यानंतर 19 मे रोजी दोन रुग्ण आढळून आले.त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 21 मे रोजी तब्बल सत्तावीस रुग्ण आढळून आले.
त्यानंतरही बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळण्याचे सत्र हे सुरूच होते. 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी 9 रुग्ण, 29 मे तीन रुग्ण,30 मे रोजी चार रुग्ण,31 मे रोजी एक रुग्ण,2 जून रोजी दोन ,12 जून रोजी एक रुग्ण ,13 जून रोजी एक रुग्ण आणि आज 14 जून रोजी आणखी एक रुग्ण असे एकूण 72 रुग्ण आतापर्यंत कोरोना बाधित आढळून आले आहे.
कोरोना बाधित आढळून आलेले 72 रुग्ण हे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. अर्जुनी/मोरगाव तालुका – 31,सडक/अर्जुनी तालुका – 10, गोरेगाव तालुका – 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका – 2, गोंदिया तालुका – 20 आणि तिरोडा तालुका – 4 रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील 1256 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये 72 रुग्ण कोरोना बाधित आढळले. अद्याप 42 नमुन्यांचा चाचणी अहवाल गोंदिया येथील विषाणू प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील सर्व 69 रुग्ण कोरोनामुक्त झाले.आज आणखी एक नवीन कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 72 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.जिल्ह्यात आता तीन क्रियाशील कोरोना बाधित रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 1226 आणि घरी 1475 असे एकूण 2701 व्यक्ती अलगीकरणात आहे.
*घरीच राहा*
*सुरक्षित राहा*
*काळजी घ्या*





