कोरची,दि.१५: जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा परवाना काढून भाजीपाल्याच्या वाहनातून चक्क सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात आहे. कोरची पोलिसांनी नुकतेच एका वाहनातून ८० हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
देसाईगंज येथील भाजीपाला व्यापारी लकी उर्फ लंकेश हटनागर हा आपल्या एम.एच.३६-एए३९९ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून राजनांदगाव येथून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी १३ जूनच्या संध्याकाळी नाकेबंदी करुन वाहन अडविले. यावेळी वाहनात ८० हजार रुपये किमतीचा ‘ईगल’ व ‘मजा’ नामक सुगंधित तंबाखू जप्त केला. शिवाय ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनही ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोडबोले, पोलिस उपनिरीक्षक कोंडुभैरी, श्रीमंगल यांच्यासह शिपाई निशांत व सचिन यांनी ही कारवाई केली. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी वाहनधारकाची कसून चौकशी केली तर सुगंधित तंबाखूचा व्यापार करुन मोठी रक्कम कमविणारे अनेक मोठे व्यापारी गळाला लागू शकतात. देसाईगंज व आरमोरी ही दोन शहरे सुगंधित तंबाखूच्या तस्करीची केंद्रे आहेत, हे येथे उल्लेखनीय.





