सडक अर्जुनी,दि.15ःमध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून, तसेच इतर जिल्ह्यातून गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून गोवंशांना वाहनात टाकून सडक अर्जुनी तालुक्यातून वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळताच पांढरी-कोसमतोंडी मार्गाने जात असलेल्या वाहनाला थांबवून पोलिसांना माहिती दिली. पिकप क्रमांक एमएच 36-एफ1956 या वाहनातून 12 गोवंश कत्तली करीता नेत असल्याचे आढळल्याने त्या वाहनाच्या पाठलाग करून त्याला पांढरी येथील रेल्वे क्रॉसिंगवर अडवून पोलिसांना माहिती देत वाहन पोलीस स्टेशन डुग्गीपारला जमा करण्यात आले.
पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी करून त्यात सहा गोरे व सहा गाई निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत आढळले.त्या बाराही जनावरांना मुक्त करून त्यांची जोपासना करण्याकरता चिचगाव येथील कामधेनु गोशाला गौ अनुसंधान केंद्रात पाठविले. फिर्यादी जगदीश्वर बिसेन यांच्या तक्रारीवरून पिकप वाहन चालक आकाश मुलचंद गडकरी (वय 19) व राजा(वय 30) यांच्यावर अपराध क्रमांक 156 कलम 11, (1),(ड), प्राणी निर्दयतेने वाहतूक कायदा 1960 कलम सहा, 9 ,महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा अधिनियम 2015, मोटार वाहन कायदा तीन, 181 सहा कलम 34 भादवि नुसार कारवाई करून गोवंशाची किंमत 60000,पिकप वाहन किंमत 150000 ,असे दोन लाख दहा हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार संजय वडेट्टीवार करीत आहे.





