गोंदिया,दि.16ः-गोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ए.ई.हाश्मी यांचा अद्यापही जिल्हा परिषद यंत्रणेचा मोह सुटेना अशी अवस्था झाली आहे.अति.मुकाअ करीता असलेले वाहन जरी त्यांनी सोडले असले तरी त्यादिवसापासूनच जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याकडे असलेले एक वाहन त्यांना त्या दिवसापासूनचे सेवेत उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यातही सोमवार व मंगळवारला त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या फुलचूर आयटीआय कार्यालयात जिल्हा परिषदेत भाडेतत्वावर लावलेले वाहन क्रमांक एमएच 35 एजी 1334 ने दाखल होत जिल्हा परिषदेची यंत्रणा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावर नव्हे तर आपल्या एका आवाजावर कशी चालते हेच दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून आले.गेल्या दोन दिवसापासून हाश्मी हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जवळपास दीड ते अडीच तास बसून राहत असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विभागप्रमुखाचेही आता नियंणत्र राहिले नसल्याचे बोलले जात आहे. 31 मार्चला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची सेवा विनपगारी कोवीड-19 करीता घेण्यात आली होती.त्या संधीचा लाभ घेत त्यांनी सुरवातीला जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारतीमध्ये आपले बस्तान मांडले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील मानव विकास कार्यालयात बस्तान मांड़ून जिल्हा परिषदेच्या बांधकाम व लपा विभागाच्या अधिकार्यांना फाईल घेेऊन बोलावत 31 मार्चच्यापुर्वीच्या तारखेत अनेक काम करण्याचा दबावतंत्र त्यांनी वापरल्याची चर्चा होती.त्या सर्वांचे सविस्तर वृत्त बेरार टाईम्सने सतत प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनीही दखल घेत मुख्यमंत्र्यापर्यंत या प्रकरणाची तक्रार केली.त्या सर्वामुळे जिल्हाधिकारी यांनी 10 जून रोजीच त्यांना कोवीड 19मधून वाहनासह कार्यमुक्त केले.त्यानंतरही हाश्मी यांनी जिल्हा परिषदेचा पिच्छा काही सोडलेला नाही





