
मुंबई, २१ जून– योग हा दैनदिन जीवनशैलीचा भाग असून, शरीर स्वस्थ ठेवण्याचे आणि मनशुद्धी ठेवण्याचे एक प्रभावी माध्यम असून नियमित योग आणि प्राणायममुळे सकारात्मकता वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी केले. मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, कैवल्यधाम, एचएनएससी विद्यापीठ आणि एचएनएससी बोर्ड यांच्या सयुंक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते उपस्थितांशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जीवनात मार्गक्रमण करताना संपूर्ण समाजाशी, जगाशी आपले नाते वृध्दींगत करण्याची गरज असून सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून नेतृत्वगुण विकासाला चालना देणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज योगामुळे जग जवळ आले आहे. फक्त योग दिनाच्या निमित्तानेच योगाकडे न बघता योग हा आपल्या दैनदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून याकडे पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समुहभावना आणि सहकार्यातून अपेक्षित परिणाम साधण्यासाठीही योगाकडे पाहणे अधिक सयुंक्तिक असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कोव्हीड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने योग दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, मा. राज्यपाल तथा कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी, आयुष मंत्रालयाचे मा. मंत्री श्री श्रीपाद नाईक यांचे व्हिडीओ संदेश प्रसारीत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाला एचएनएससी मंडळाचे अध्यक्ष किशू मनसुखानी, सचिव डॉ. पंजवानी, प्राचार्या हेमलता बागला, प्राचार्या मंजू लालवाणी, कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी आणि संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. सुधीर पुराणिक हे उपस्थित होते.
जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ, कैवल्यधाम आणि एचएनएसची बोर्ड यांच्या सयुंक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल करिता पाच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ११ जून ते २१ जून पर्यंत याचे आयोजन करण्यात आले होते. कैवल्यधाम यांच्यामार्फत ५०० विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक देऊन प्रशिक्षित करण्यात आले. तर १८ ते २० जून पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, सहसंचालक उच्च शिक्षण कोकण विभाग डॉ. संजय जगताप आणि राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दररोज ३५० अधिक स्वयंसेवकांची या कार्यशाळेला उपस्थिती लाभली होती. आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील सुमारे ३५० राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी केले.




