25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ ककोडी मार्गावरील अवैध वाहतूक अनियंत्रित

ककोडी मार्गावरील अवैध वाहतूक अनियंत्रित

0
610

ककोडी/देवरी,दि.24: राष्ट्रीय महामार्गावर सीमा शुल्क तपासणी नाका आहे. याठिकाणी पोलीस आणि इतर विभागाचे अधिकारी तैनात असतात. त्यामुळे अवैधरित्या होणारी वाहतूक या ठिकाणावरुन करण्यात येत नाही. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातून छत्तीसगडकडे आणि छत्तीसगडातून महाराष्ट्रात होणारी वाहतूक जंगलव्याप्त नक्षलग्रस्त ककोडी परिसरातून करण्यात येते. प्रशासनाने ही वाहतूक रोखण्याकरिता हाईट बेरिअर बसविले. मात्रते बेरिअर तोडून वाहतूक सुरु करण्यात आली. परिणामी ही बेबंदशाही रोखणार तरी कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील ककोडी ते चिचगड मार्गावर ओव्हरलोड वाहनांची वाहतूक गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. हा मार्ग महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना जोडतो. हा मार्ग जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त असल्याने अवैधरित्या वाहतूक करण्याकरिता या मार्गाला पसंती देण्यात येते. हा प्रकार प्रशासनाला देखील माहित आहे. हा प्रकार थांबविण्याच्या उद्देशाने ककोडी-चिचगड मार्गावर हाईट बेरिअर बसविण्यात आला आहे. मात्र तस्करांनी बेरिअर तोडून आपला गोरखधंदा सुरु ठेवला आहे. जनावरांची तस्करी, अवैधरित्या होणारी इतर साहित्याची वाहतूक व शिरपूर येथे तयार करण्यात आलेला चेकपोस्ट, नाका चुकविण्याच्या उद्देशाने या मार्गावरुन रात्रभर वाहतूक केली जाते. जनावरांच्या वाहतुकीकरिता हा मार्ग प्रसिद्ध आहे. अनेकदा पोलीस विभागाने कारवाई देखील केली. मात्र विभागातीलच काही धृतराष्ट्रांमुळे ह गोरखधंदा फुलत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारावर आळा घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे.