38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ रुरल मार्ट – बचतगटांना मिळाली हक्काची बाजारपेठ

रुरल मार्ट – बचतगटांना मिळाली हक्काची बाजारपेठ

0
249

blank

वाशिम, दि. २५ (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना बचतगटाच्या माध्यमातून संघटीत करून त्यांना पदरच्या थोड्या थोडक्या पैशांची बचत करून त्या पैशाचा लेखाजोखा ठेवून त्यांना त्या पैशातून उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास चालना दिली आहे. केवळ बचतगटाच्या माध्यमातून पैशाची बचत न करता त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या स्वावलंबनाचा मार्ग शोधला आहे.

कारंजा येथे जिल्ह्यातील बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि साहित्याची विक्री करता यावी, यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात ‘नाबार्ड’च्या सहाय्याने रुरल मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 पूर्वी चूल आणि मूल एवढेच कार्यक्षेत्र महिलांचे होते. त्या काळातील कर्तृत्ववान महिलांमुळे महिलांच्या प्रगतीची कवाडे खुली होण्यास सुरुवात झाली. कर्तृत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिला आज प्रगती करतांना दिसत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करतांना दिसत आहे. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी” असे महिलांच्या बाबतीत सन्मानाने बोलल्या जाते.

घरच्या कर्त्या पुरुषाला साथ देण्यासोबतच संसाराचं रहाटगाडग व्यवस्थित चालविण्यात महिलांचा वाटा महत्वपूर्ण आहे. पदरमोड करून पै-पै पैशाची बचत करून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला ह्या बचतगटाच्या माध्यमातून संघटीत झाल्याचे चित्र आपणास पहावयास मिळते. इथंपर्यंतच या महिला थांबल्या नसून पुढेही जाऊन त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाची कास धरल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

कारंजा येथील रुरल मार्ट येथे वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत महिला बचतगटातील महिलांनी आणि गटांनी उत्पादित केलेल्या जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ व शोभेच्या वस्तू ग्राहकांना एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

नऊ महिन्याच्या रुरल मार्टच्या प्रवासात या वस्तू तसेच खाद्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. सुरुवातीला एक हजार रुपये विक्रीपासून सुरुवात करून मागील सहा महिन्यांमध्ये रुरल मार्टच्या प्रगतीचा आलेख हा वाढतांना दिसत आहे. दरमहा 12 ते 15 हजार रुपये उत्पन्न रुरल मार्टच्या माध्यमातून मिळत आहे. उत्पादनाची गुणवत्ता हीच विश्वासार्हता मिळविण्यास रुरल मार्ट यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

नाबार्डच्या रूरल मार्ट या उपक्रमाअंतर्गत माविमच्या बचतगटांच्या महिलांना त्यांच्या उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तसेच त्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचतगटांना त्यांची उत्पादने विक्री करण्याची संधी मिळाली आहे. महिलांना या माध्यमातून रोजगार कायम ठेवण्यास मदत झाली आहे.

ग्राहकांच्या पसंतीच्या वस्तू वेळेत रुरल मार्टमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमध्ये बाजारात वस्तूंचे भाव वाढवून विकण्यात येत होते. परंतु रुरल मार्टमध्ये कणिक, बेसन, मुंग वड्या, पापड, सातूचे पीठ, हस्त निर्मिती कापडी मास्क आणि दैनंदिन वापराच्या वस्तू माफक दरात उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात सामाजिक जाणिवेतून कारंजा येथील अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढाकाराने बचतगटातील गरीब 60 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्यात आली आहे. रुरल मार्टमधून ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांची उत्पादने, पारंपारिक उत्पादने, गावरान वस्तू शहरातील ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व साहित्य विक्रीस रुरल मार्टमध्ये उपलब्ध झाल्याने बचतगटातील महिलांना उद्योजक होण्यास चालना मिळत आहे.

blank