
गोंदिया,दि.25ः-गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांनी विधानसभा निवडणुकीतही भाजप उमेदवार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांच्यासोबत राहून काम केले होते.त्यानंतरही त्यांनी आपण माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यासोबतच असल्याचे अनेकदा दाखविले मात्र भाजप प्रवेशावर त्यानी मौन बाळगले होते.मात्र 24 जून रोजी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष पदावरुन पुरुषोत्तम कटरे यांची उचलबांगडी झाल्यानंतर एड.नामदेव किरसान नवे जिल्हाध्यक्ष झाले.नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष एड.नामदेव किरसान यांच्या स्वागतासाठी आयोजित येथील शहिद भोला भवनातील सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी आपण नवनियुक्त काँग्रेस अध्यक्षांच्या सोबत असल्याचे दाखवल्याने माजी आमदार अग्रवाल गटाला जब्बर धक्का बसला आहे.विशेष म्हणजे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांनी यापुर्वीच आपण काँग्रेसमध्ये असल्याचे जाहिर केले होते.त्यानंतर ते सुध्दा आजच्या मंचावर दिसून आले.मात्र जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य तसेच जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी या सत्कार कार्यक्रमाला गैरहजर दिसून आले.तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकात गिनती असलेल्यांची उपस्थिती मोठ्याप्रमाणात दिसून आली.





