24.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ पशुपालकांना अनुदानावर मिळणार दुधाळ जनावरांचे वाटप

पशुपालकांना अनुदानावर मिळणार दुधाळ जनावरांचे वाटप

३१ जुलैपर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज स्वीकारणार

0
297

वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलै २०२० पर्यंत पंचायत समितीस्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना विशेष घटक योजना अंतर्गत तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना २ दुधाळ जनावरांचा ७५ टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड झाल्यानंतर एका महिन्यात संबंधित लाभार्थ्याला २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागणार आहे. या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना प्रथम १ व सहा महिन्यानंतर दुसरे दुधाळ जनावर राज्याबाहेरील किंवा जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून खरेदी करून देण्यात येईल.

अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेतून तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी उपयोजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर १० शेळी व एक बोकड अशा गटाचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यास एका महिन्याच्या आत उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीसाठी १७ हजार ८१० व स्थानिक जातीसाठी ११ हजार ९६२ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागेल.

सर्वसाधारण योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ हजार किंमतीच्या २५ मादी व ३ नरचा समावेश असलेला तलंगा गट पुरविण्यात येणार आहे.

सर्व योजनांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि पशुसंवर्धन सभापती डॉ. श्याम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी केले