23 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home राष्ट्रीय देश डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीत दाखल, राष्ट्रपती, पंतप्रधान विमानतळावर उपस्थित

डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीत दाखल, राष्ट्रपती, पंतप्रधान विमानतळावर उपस्थित

0
28

नवी दिल्ली, दि. २८ – भारताचे मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे पार्थिव दिल्ली विमानतळावर दाखल झाले असून यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉ. कलाम यांचे पार्थिव घेऊन येणारे वायुदलाचे विशेष विमान पालम विमानतळावर पोहोचले. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी कलाम यांना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांनी डॉ. कलाम यांना मानवंदना दिली.
सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम ६.३० च्या दरम्यान अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबियांच्या विनंतीवरुन कलाम यांच्यावर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे बुधवारी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

सकाळी सव्वासहाच्या सुमारास शिलाँगहून हवाईदलाच्या विमानाने गुवाहाटीला कलाम यांचे पार्थिव आणण्यात आले. कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीला आणल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही.शानमुघनाथन यांनी श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
कलाम यांच्या निधनाने देशाचे न भरुन येणारे नुकसान झाल्याची भावनिक प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी दिली. कलाम यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना लहान मुले खूप आवडत. आसामच्या ग्रामीण भागात मी अनेकदा त्यांना घेऊन गेलो. कलाम यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आणि प्रामाणिक होते, असे गोगोई म्हणाले.माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंता यांनीही कलाम यांना आदरांजली वाहिली. लोकांचे राष्ट्रपती गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सोमवारी संध्याकाळी कलाम शिलाँगमधील आयआयआयएममध्ये जाहीर कार्यक्रमात भाषण करत अचानक कोसळले. त्यांना तातडीने बेथनाय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी कलाम यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

कलाम यांच्या निधनानंतर शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र कोणतीही सुट्टी जाहीर झालेली नसून सर्व शाळा, कॉलेजेस व सरकारी कार्यालये सुरू राहणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संसदेत माजी राष्ट्रपतींना वाहिली श्रद्धांजली…
दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात आज डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कलाम यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली तर राज्यसभेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दोन दिवसांसाठी व राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

blank