मुंडीपार शाळेच्या छताचा भाग कोसळला

0
5

गोंदिया,(दि.28)-मुंडीपार येथील जिल्हा परिषद शाळेतील एका वर्गखोलीतील छताचा भाग मंगळवारी दुपारी कोसळला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. छताचे मोठे पोपडे कोसळले त्यावेळी जेवणाची सुटी झाली होती. विद्यार्थी वर्गखोलीतून बाहेर पडत होते. त्यावेळी मोठा आवाज होऊन छताचा भाग कोसळला. बहुतांश विद्यार्थी खोलीतून निघून गेले होते. परंतु सीमेंटी छताचा भाग कोसळला त्यावेळी तीन विद्यार्थी खोलीतून बाहेर पडत होते. ते यात जखमी झालेत.

तीनही विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर शासकीय आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. मुंडीपार येथील शाळेच्या ईमारतीचे छत आधी कौलारू होते. सुमारे २० वर्ष जुन्या असलेल्या या ईमारतीचे कौलारू छत सीमेंटचे करण्यात आले. स्लॅबचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याची ओरड अनेक दिवसांपासून होत होती. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे व योग्य ती दुरूस्ती वेळोवेळी करण्यात न आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.