अवैध गर्भपातप्रकरणी वाशिम येथील डॉक्टरसह दोघांना अटक

0
29
  • पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कार्यवाही

वाशिम, दि. १९ : जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर मिळालेल्या अवैध गर्भपाताबाबतच्या गोपनीय माहिती आधारे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या चमूने वाशिम शहरातील रमेश टॉकीज जवळील डॉ. शशिकांत सारसकर याच्या दवाखान्याची अचानक तपासणी केली. याठिकाणी दाखल असलेल्या एका महिलेवर गर्भपाताकरिता अवैधपणे उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. सारसकर व बोगस डॉक्टर विलास ठाकरे या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांनाही वाशिम शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

गर्भधारणापूर्व तसेच प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणे पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्यास याबाबतची माहिती नागरिकांकडून गोपनीय स्वरुपात मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर ८४५९८१४०६० हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून त्याला १ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या चमूने १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी डॉ. शशिकांत सारसकर याच्या दवाखान्यावर अचानक धाड टाकली. या दवाखान्यात हिंगोली जिल्ह्यातील एक ४० वर्षीय महिला गर्भपाताकरिता १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून भरती असल्याचे व तिच्यावर गर्भपाताकरिता उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तिच्याकडे हिंगोली येथील निदान इमेजिंग सेंटरमधील सोनोग्राफी रिपोर्ट आढळून आला. आरोग्य चमूने या महिलेची तपासणी केल्यानंतर ही महिला २४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे व तिची प्रसूतीची क्रिया सुरु झाल्याचे आढळून आले.

यावेळी केलेल्या चौकशीमध्ये महिलेच्या गर्भपातासाठी बोगस डॉक्टर विलास ठाकरे याने उपचार केल्याचे सांगण्यात आले. दवाखान्याची झाडाझडती घेत असताना बोगस डॉक्टर विलास ठाकरे याच्याकडे गर्भपातासाठी आवश्यक असणारी औषधे आढळून आली. त्यामुळे याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गर्भपाताचे उपचार करण्यात आलेल्या महिलेला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून सुरक्षित गर्भपातानंतर महिलेची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी कळविले आहे.

अवैध गर्भपात, गर्भलिंगनिदान होत असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्या

जिल्ह्यामध्ये गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची माहिती नागरिकांकडून गोपनीयरित्या प्राप्त होण्यासाठी ८४५९८१४०६० हा स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी होत असल्यास त्याची गोपनीय माहिती अथवा तक्रारी नागरिकांना या हेल्पलाईन क्रमांकावर पाठविता येतील. तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून त्यांना १ लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. तरी नागरिकांनी अवैध गर्भपात, गर्भलिंगनिदान याविषयीची माहिती हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.