भीषण अपघातात युवक-युवती ठार

0
22
अमरावती:भरधाव कार रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या ट्रकवर आदळल्‍याने झालेल्‍या अपघातात एकाच परिसरात राहणाऱ्या युवक आणि युवतीचा जागीच मृत्‍यू झाला. राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या द्रूतगती वळण मार्गावर कोंडेश्‍वर टी-पॉइंटजवळ सोमवारी हा अपघात घडला. घटनेनंतर दोन्‍ही मृतांच्‍या नातेवाईकांमध्‍ये रुग्‍णालय परिसरात हाणामारी झाली, त्‍यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरी यशवंत शेळके (१७) व आदित्य अखिलेन्द्र विश्वकर्मा (१९, दोघेही रा. शिवाजीनगर, सूतगिरणी रोड) अशी मृतांची नावे आहेत.

आदित्य व गौरी हे एमएच ३४ बीआर १४९५ या क्रमांकाच्या कारने द्रूतगती महामार्गाने जात असताना कारची उभ्या ट्रकशी धडक झाली. कार आदित्‍य चालवत होता. घटनास्थळी धावून गेलेल्या नागरिकांनी पोलीस तसेच रुग्‍णवाहिकेला पाचारण केले. मात्र त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. धडक एवढी जबर होती की कार चक्‍काचूर झाली. गौरी ही येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी सात वाजता तिच्या वडिलांनीच तिला महाविद्यालयात पोहचवून दिले होते. तर, आदित्य हा नरसम्मा महाविद्यालयाचा १२ वीचा विद्यार्थी होता.

दोघे शेजारी असल्याने त्यांच्यात ओळख होती. गौरीशी मैत्री वाढवण्‍याच्‍या प्रयत्नात तो असल्याने त्याच्या व आपल्या कुटुंबात वाद देखील झाले होते, असे गौरीच्या कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी आदित्यविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा गौरीच्या कुटुंबांनी घेतला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृत आदित्यविरूध्द गुन्हा दाखल केला. मृत मुलीच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप आदित्‍यच्‍या चुलतभावाने केला. मृताच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी मुलीच्या काही नातेवाईकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

गौरीला आदित्यने कॉलेजमधून पळवून नेले. मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला. तर, आदित्यच्या नातेवाईकांनी मुलीला दोषी ठरविले. यावरून मृत आदित्य व गौरीच्या कुटुंब व नातेवाईकांमध्ये जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात हाणामारी झाली. एकमेकांना प्रचंड शिवीगाळ करण्‍यात आली. काहींनी आदित्यच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन गृहासमोर देखील मृतांच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली. बडनेरा पोलिसांनी गौरीच्‍या वडिलांच्‍या तक्रारीवरून मृत आदित्‍यच्‍या विरोधात अपहरण, अपघात व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरीच्या शवविच्छेदनास तिच्या कुटुंबियांनी होकार दिला.