सोंटू जैनची सर्वोच्च न्यायालयात धाव; पोलिसांकडून ‘मनी ट्रेल’चा तपास

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया : ऑनलाइन गेमिंगच्या रॅकेटमध्ये ओढून एका व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक करणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू जैन याच्याकडून अटक टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, तेथे ९ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सोंटूच्या मनी ट्रेलचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला सोंटूचे नागपूर आणि गोंदियातील काही बुकींशी ‘कनेक्शन’ आढळून आले आहे. त्यांचीदेखील लवकरच गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्यापही पोलिसांना फरार सोंटूचा सुगावा लागलेला नाही.
२६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोंटूचा अंतरिम जामीन फेटाळला होता. याची माहिती मिळताच सोंटू नागपुरातून पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ३० सप्टेंबर रोजी सोंटूने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथूनही त्याची याचिका रद्द करून घेण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सोंटूसोबतच गोंदियातील हवाला कंपनीचा कर्मचारी, व्ही. पटेलचा कर्मचारी विक्कीदेखील बेपत्ता आहे. विकी हा गोंदियातील गुन्हेगार असून तो गोंदियातील बुकींसाठी काम करतो. गोंदियातील बहुतांश बुकी विक्कीच्या माध्यमातूनच व्यवहार करतात. विकी दीर्घकाळ सोंटूशी संबंधित होता. २६ सप्टेंबरपासून तोदेखील गायब असल्याने गोंदियाचा बुकींनीच सोंटूला पळून जाण्यास मदत केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. सनी नावाचा बुकीदेखील सोंटूचा मित्र असून त्यानेच सोंटूला वाहन उपलब्ध करून दिले असण्याची शक्यता आहे. २६ सप्टेंबरला सकाळी कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच सोंटू रामटेकला पोहोचला होता. या निर्णयाची माहिती मिळताच त्याने तेथून पळ काढला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.