१२ वर्षापुर्वीच्या हत्येचा बदला;गोलू तिवारी हत्याप्रकरण ७ आरोपींना अटक

0
39

गोंदिया- शहरातील रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कुडवा नाकास्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील फुटपाथवरील सायकल दुकानाजवळ सोमवारच्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जुन्या वैमन्यासातून व आर्थिक देवाणघेवाणाच्या वादातून वाळू व्यवसायिक  गोलू उर्फ रोहीत तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली.या घटनेत गोलु तिवारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना जेरबंद केले असून २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बनकर यांनी दिली.

आरोपीमध्ये मुख्य आरोपी मोहीत मराठे(शास्त्री वार्ड ३२),राजेंद्र दावणे(वय ३५),हिरो शंकर दावणे वय ४२,रा.दसखोली),शिवानंंद ऊर्फ सुजल भेलावे १९,रितेश खोब्रागडे(वय २३)गोंदिया,विनायक नेवारे (वय २१,गिरोला/पांढराबोडी) व सतिश सेन रा.पन्नागार जबलपूर मध्यप्रदेश यांचा समावेश आहे.आरोपींनी दोन दुचाकीवर चौघेजण जाऊन गोलू तिवारी याच्यावर एक राऊंड चालवला.तो गोलूच्या  पाठीमागील  डाव्याबाजूच्या भागाला लागल्याने आपला जीव वाचविण्याकरीता गोलू आपल्या दुचाकीने घराकडील रुग्णालयाकडे निघाला.परंतु शालीमार हाॅटेलसमोरील वळणरस्त्यावर त्याचे वाहनावरील नियंंत्रण सुटल्याने खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यामुळे तिथे उपस्थितांनी त्याला अवंती चौकातील रुग्णालयात हलविले.रुग्णालयातील डाॅक्टरांनी सुध्दा गोलूच्या डोक्याला गंभीर दुखापत दिसल्याने व त्यांना गोळी लागल्याचे कुठेच दिसून न आल्याने डोक्याच्या उपचार करीत असतानाच त्याचा मृत्यू झाला.झालेल्या गोळीबाराने पुन्हा शहरात गॅंगवार सुरु झाल्याचे बघावयास मिळाले.यात गोलु उर्फ रोहीत तिवारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपींना पकडण्याकरीता पथके गठित करुन अवघ्या काही तासात ७ आरोपींना ताब्यात घेत त्याना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना बानकर यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदेश केंजळे उपस्थित होते.पुुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय बस्तवडे हे करीत आहेत.आरोपीवंर भादंवीचे कलम ३०२,३४,३/२५ आर्म एक्ट,सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून हत्याकांडात वापरण्यात आलेले बंदुक व वाहन जप्त करण्यात आलेले नव्हते.

सविस्तर असे की, शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित रोहीत ऊर्फ गोलू हरिप्रसाद तिवारी हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३५,एव्ही ७९७९ ने आपल्या हनुमानगर घराकडे येत असतांना जिल्हा बँकेसमोर दोन मोटारसायकवर आलेल्या आरोपींनी गोलू याच्यावर मागून गोळीबार केला.यात गोलू तिवारीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो खाली पडला.यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला अवंती चौकातील सहयोग रुग्णालयात दाखल केले.दरम्यान या घटनेची माहिती शहरात पसरताच वाळू व्यवसायाशी संबधित सर्वांनीच अवंती चौकातील सहयोग रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच गोलु तिवारी यांचा मृत्यूू झाल्याचे कळताच त्यांच्या मित्रमंडळीनी रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड करुन मोठ्याप्रमाणात नुकसान केले.त्यानंतर पोलीस पोचताच सर्वांना बाहेर काढण्यात आले.

१२ वर्षापुर्वीच्या भावाच्या हत्येचा बदला

गोंदिया शहरातील शक्ती चौकात (शासकीय विश्रामगृहाजवळील) जमिनीच्या देवाणघेवाणाच्या वादातून ९ आँक्टोंबर २०१२ रोजी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष धरम दावणे यांची देशीकट्याचे दोन राऊंड फायर करुन व तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती.या हत्याप्रकरणात मृतक गोलू तिवारी यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता.त्याप्रकरणाला घेऊनच नियोजनबध्दरित्या गोलुवर गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याचे मृतकाचा भाऊ राहुल तिवारी याचे म्हणने आहे.घटनेच्या २ वर्षापुर्वी दोघांना गोलुकडे पाठविण्यात आले होते.त्यानंतर त्यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर ते तुरुंगात गेले.तुरुगांत गेल्यानंतर त्याच गँगच्या युवकांना हाताशी धरुन या घटनेला अंजाम दिल्याचे मृतकाच्या भावाचे म्हणने आहे.स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांना घटनास्थळावरुन एका गोळीचा काडतूस कॅप मिळाल्याने या घटनेत एकापेक्षा अधिक बंदुकीचा वापर झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून, यामध्ये व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धेत पराभूत करण्यासाठी वेगवेगळे डावपेच अवलंबले आहेत.