37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता रेकी करणा­र्या नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस व सिआरपीएफने केली अटक

रेकी करणा­र्या नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस व सिआरपीएफने केली अटक

0
54

blank

गडचिरोली,दि.०१ः जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. सुरक्षा दलांविरुद्धच्या हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका नक्षल समर्थकास काल दिनांक 30/09/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 110 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

भामरागड परिसरामध्ये पोस्टे भामरागड येथील पोलीस पथक, सिआरपीएफ 37 बटा. एफ कंपनीचे जवान माओवादविरोधी अभियान राबवित असताना इंट सेल प्राणहिता येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित इसम भामरागड परिसरात सुरक्षा दलातील जवानांची रेकी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. यावरुन पोस्टे भामरागड व सिआरपीएफच्या जवानांनी त्याला भामरागड परिसरातून दिनांक 29/09/2025 रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी सदर संशयीत व्यक्तीकडे विचारपूस केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता, चौकशीअंती सदर इसम हा कट्टर नक्षल समर्थक सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी, वय 38 वर्षे, रा. पोयारकोठी, ता. भामरागड, जि. गडचिरोली असल्याचे उघड झाले. अधिक चौकशी दरम्यान पोलीसांच्या अभिलेखावरील विध्वंसक कारावाया व गुन्ह्रांमध्ये सक्रीय सहभाग असल्याची शक्यता असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तो भामरागड परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाला होता. सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी याचा दिनांक 27/08/2025 रोजी पोस्टे कोठी हद्दीतील मौजा कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात पोलीस व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने पोस्टे कोठी येथे दाखल अप क्र. 02/2025 अन्वये काल दिनांक 30/09/2025 रोजी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते हे करीत आहेत. तसेच इतर विध्वंसक कारावाया व गुन्ह्रांमध्ये सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी याच्या सहभागाची पडताळणी सुरु आहे.

blank