सोनाळा पोलिसांनी केला सिनेस्टाइल पाठलाग
बुलढाणा-मध्य प्रदेशातून विदर्भात गावठी पिस्टलची तस्करी करणाऱ्या दोघांना सोनाळा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. एक तस्कर फरार झाला. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा शिवारात ही कारवाई करण्यात आली.
मोहंमद नफीस अकील व मोहंमद उबेद रजा मोहंमद अशी गावठी पिस्तूलची तस्करी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दोघेही चांदा मेथा, ता. पर्चीया जि. छिंदवाडा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत. तस्करांकडून पाच देशी कट्टे, दोन मॅगझिन व १६ काडतूस, दोन मोबाइल तसेच स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली.
लाडणापूर ते सोनाळा सोनाजीनगरपर्यंत पोलिसांनी पाठलाग केला. अखेर हनुमान मंदिराजवळ वाहन आडवे लावून आरोपींना पकडण्यात आले.सोनाळा पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोहेकॉ विशाल गवई, राहुल पवार, गणेश मोरखडे, रमेश खरात व चालक ईमरान शेख यांनी ही धाडसी कारवाई केली.





