27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता २२ लाखाची चोरी करणाऱ्या बाप लेकाला स्थागुशाने १२ तासात केले जेरबंद

२२ लाखाची चोरी करणाऱ्या बाप लेकाला स्थागुशाने १२ तासात केले जेरबंद

0
46

गोंदिया: जिल्ह्यात  फुलचूर परिसरात भररात्री एका घरात घुसून चाकूच्या धाकावर जबरी चोरी करण्यात आली. मात्र, गोंदिया पोलिसांनी आपल्या तपासाचे ‘चक्रव्यूह’ असे रचले की,अवघ्या १२ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बालाघाट सीमेवरून बाप-लेकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून २२ लाख ६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२५ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री, साई माऊली कॉलनी, फुलचूर येथील रहिवासी प्रतीक लालचंद उईके (२७) हे आपल्या आईसोबत घरात असताना मध्यरात्री कुणीतरी दरवाजा ठोठावला. प्रतीकने दरवाजा उघडताच तोंडाला दुपट्टा बांधलेल्या दोन नराधमांनी आत प्रवेश केला. माय-लेकांच्या मानेवर धारदार चाकू टेकवून “ओरडाल तर जिवानिशी ठार करू” अशी धमकी दिली. दहशतीच्या या छायेत आरोपींनी कपाटातील १३९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४३८ ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ९६ हजार ६४० रुपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. अहेरकर यांनी तातडीने दोन विशेष पथके तैनात केली. तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, त्याच कॉलनीत भाड्याने राहणारे मुकेशकुमार डोंगरे (५९) व आर्यन मुकेशकुमार डोंगरे (२४) हे दोघे संशयास्पद रित्या पसार झाले आहेत.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढला असता, ते मध्यप्रदेशातील बालाघाटच्या दिशेने पळत असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या पथकाने रजेगाव (जि. बालाघाट) परिसरात सापळा रचून या पिता-पुत्राला सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील काळ्या रंगाच्या स्कूल बॅगमध्ये लुटलेले दागिने आणि रोख रक्कम मिळून आली.ही संपूर्ण धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बनिता सायकर, पो.हवा. संजय चव्हाण, दिक्षितकुमार दमाहे, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, प्रकाश गायधने, सुबोधकुमार बिसेन, पो.शि. छगन विठ्ठले, राकेश इंदुरकर व चा.पो.शि. घनश्याम कुंभलवार यांनी यशस्वीपणे पार पाडली.अवघ्या १२ तासांत गुन्ह्याची उकल करून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल गोंदिया पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (किंमत २२,०६,६४०/- रु.)
पोलिसांनी आरोपींकडून खालील ऐवज हस्तगत केला आहे:
▪️ सोने: २ कंगन, २ मंगळसूत्र, २ सोन्याच्या चैन, पदक, कानाचे टॉप्स, लटकन, लॉकेट, नथ, कानाची चैन, ३ सोन्याचे शिक्के, ३ सोन्याची बिस्किटे आणि ९ अंगठ्या (एकूण किंमत १९,४६,०००/- रु.)
▪️ चांदी: ८ शिक्के, कमरबंद, चावीचा गुच्छा, ६ पायळ, १ चांदीचे बिस्किट (एकूण किंमत १,२२,६४०/- रु.)
▪️रोख रक्कम: २८,०००/- रुपये.
▪️इतर: गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टिव्हा ४जी स्कुटी (८०,०००/- रु.) आणि २ अँड्रॉइड मोबाईल.