7 गुन्हे उघड; 7 दुचाकींसह तिघे जेरबंद
गोंदिया, 31 जानेवारी-गोंदिया जिल्ह्यात सातत्याने घडणार्या दुचाकी चोरीच्या घटनांना स्थानिक गुन्हे शाखेने आळा घालत उल्लेखनीय कारवाई केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील 6 व छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील 1 अशा 4 लाख 5 हजाराच्या 7 दुचाकींसह आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 30 जानेवारी रोजी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चोरी करणारे टोळके चोरीच्या दुचाकी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धीरज भूषण फुंडे (35), रा. कालीमाटी, जयराम धर्मराज सेवईवर (47), रा. बालमटोला/दासगाव, योगेंद्र मुरतलाल नागपुरे (42), रा. सोनबिहारी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चौघांनी मिळून सालेकसा, कामठा, बिरसोला, रेलटोली (गोंदिया), आमगाव तसेच गहिरीभेंडा (जि. राजनांदगाव) येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 4 लाख 5 हजार रुपये सांगीतली जाते. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी सालेकसा पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, संजय चव्हाण, दीक्षितकुमार दमाहे, भोजराज बहेकार, रियाज शेख, राजकुमार खोटेले, भुवनलाल देशमुख, पोलिस शिपाई छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक पोलिस शिपाई कुंभलवार व राम खंदारे यांनी पार पाडली.





