भंडारा,दि.१४ः-जिल्ह्यातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भंडारा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या थेट आदेशावरून जिल्ह्यातील तब्बल ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करीत ७ लाख ३५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने दारू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील जवाहरनगर, भंडारा, कारधा, तुमसर, आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, साकोली, पवनी, अडयाळ आणि दिघोरी या भागांतील दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला. जिथे गावठी दारू गाळली जात होती, त्या भट्ट्या पोलिसांनी जागेवरच उद्ध्वस्त केल्या.शहापूर परिसरात महादेव बिसन बागडे याच्या अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ४६ हजार १०० रुपयांचा सडवा मोहपास आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले.
साकोली पोलिसानी अनमोल भीमराव बोरकर याच्या अड्ड्यावर धाड टाकून १ लाख ३१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात १७५० किलो सडवा मोहाफुल जप्त करण्यात आले.अड्याळ पोलिसांनी निखिल तारांच कावरे याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा सडवा मोहफास जप्त केला. तुमसरमध्ये ३ वेगवेगळ्या कारवायांत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर गोबरवाहीत चक्क जमिनीत खड्डे खोदून लपवलेला ४० हजार रुपयांचा मोहफास शोधून काढला.
भंडारा शहर, कारधा, आंधळगाव आणि तुमसर भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या महिला आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
अनेक ठिकाणी तस्करांनी नदीकाठी किंवा निर्जन ठिकाणी मोहफुलाचा सडवा लपवून ठेवला होता. मात्र, पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने या जागा शोधून काढल्या. जळाऊ लाकडे, जर्मनचे कटोरे, प्लास्टिक पाईप आणि मातीच्या चुली असा दारू गाळण्याचा संपूर्ण ‘सेटअप’ पोलिसांनी जप्त केला आहे.





