
अर्जुनी मोरगाव,दि.३१ः तालुक्यातील मोरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. पोलीस बनून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या १९ वर्षीय पायल वामन शहारे हिचा ईटियाडोह कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल २४ तासांच्या अथक शोधानंतर तिचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मंगळवारी (ता. ३१ मार्च) सकाळी आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रब्बी हंगामामुळे ईटियाडोह कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून कालवा दुथळी भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत सोमवारी (ता. ३० मार्च) सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास पायल ही नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी कालव्याकाठी गेली होती. मात्र पाय घसरल्याने ती अचानक खोल पाण्यात पडली आणि वेगवान प्रवाहामुळे क्षणार्धात वाहून गेली.
घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईक, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन व तालुका यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. कालव्यातील पाण्याची पातळी सुमारे २० फूट असल्याने शोधकार्य अत्यंत कठीण झाले होते. अखेर ईटियाडोह सिंचन विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतरही अखंड शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली.
तब्बल २४ तासांच्या प्रयत्नांनंतर मंगळवारी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पायलचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आढळून आला. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत वेदनादायक ठरला. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
पायल ही अत्यंत बुद्धिमान, जिद्दी व मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. आपल्या कष्टाच्या जोरावर पोलीस दलात भरती होण्याचे तिचे मोठे स्वप्न होते. यासाठी ती नागपूर येथे जाऊन तयारी करत होती. शारीरिक सराव, अभ्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे ती गावातील इतर मुलींसाठी प्रेरणास्थान बनली होती. मात्र नियतीने तिच्या स्वप्नांवर पाणी फेरले आणि तिचे आयुष्य अकाली संपवले.
या दुर्दैवी घटनेमुळे मोरगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. “घरचा आधार, कुटुंबाची आशा आणि गावाचा अभिमान असलेली मुलगी अशी अचानक निघून जाईल, यावर विश्वास बसत नाही,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.





