गोंदिया-. शहरालगत असलेल्या चुटिया येथील भगवान श्रीराम मंदिरात १२ एप्रिल रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी दागिने आणि रोख असा एकूण १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास शहर पोलिसांनी करून सोमवारी २ चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ९० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंदिरात चोरी झाल्याची तक्रार उमेश गोमाजी पारधी यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील पोउपनि अनिल डोंगरवार व पोलिस अंमलदार सोमवारी पेट्रोलिंग करत असताना साहील ऊर्फ रसूल रशीद शेख व त्याच्या २ साथीदारांनी मंदिरात चोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
मंदिरातील चोरी केल्याची दिली कबुली
माहितीच्या आधारे संशयित साहिल ऊर्फ रसुल रशीद शेख (२४, रा. बंडू चौक, संजयनगर गोंदिया) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार मुशीर ऊर्फ शाहरुख मुनीर शेख व वि. सं. बालकासह श्रीराम मंदिरातील चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून ६ हजार रुपये किमतीच्या ३ पितळी घंटी, ४ हजार रुपये रोख, ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी आणि दुचाकी असा एकूण ९० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.





