27.5 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home गुन्हेवार्ता काँग्रेस नेत्याच्या घराजवळ संशयितांचा वावर

काँग्रेस नेत्याच्या घराजवळ संशयितांचा वावर

0
159

देवरी -शहरातील चिचगड रोड परिसरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या एक संशयास्पद प्रकारामुळे खळबळ उडाली. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्या उषाताई शहारे यांच्या निवासस्थानाजवळ ९ ते १० संशयित युवक फिरताना आढळले. एका वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

माहितीनुसार, शनिवारी रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास देवरी नगर पंचायत प्रभाग क्रमांक १५ अंतर्गत चिचगड रोड परिसरात काही युवक संशयास्पद हालचाली करताना दिसले. यातील काही युवकांनी कथितरीत्या उषाताई शहारे यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. याचवेळी शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने संशयित युवकांना पाहताच आरडाओरड केली. त्यामुळे युवकांनी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विशेष म्हणजे, ही घटना देवरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य मार्गावर घडल्याने शहरातील रात्रीची सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस गस्त यावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “पोलीस ठाण्याजवळच अशा घटना घडत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

blank