30.2 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home गुन्हेवार्ता ‘लव्ह मॅरेज’चा शेवट राड्यात! दोन्ही कुटुंबीय भिडले; जळगावात पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा...

‘लव्ह मॅरेज’चा शेवट राड्यात! दोन्ही कुटुंबीय भिडले; जळगावात पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्या!

0
12

जळगाव : विवाहानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तरुण-तरुणीच्या प्रेम प्रकरणाने शुक्रवारी शहरात रात्री मोठे नाट्यमय वळण घेतले. दोघांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच ते मोठ्या संख्येने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले.

सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरुवात झालेल्या या घटनेने काही मिनिटांतच उग्र स्वरूप धारण केले. दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी एकमेकांवर धावून जात मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या गोंधळात पोलीस ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फुटल्या असून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले.

जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक तरुणी यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी काही दिवसांपूर्वी घर सोडले. त्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने विवाह केला. विवाहानंतर भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये तसेच कायदेशीर संरक्षण मिळावे या उद्देशाने दोघांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजेरी लावली.

धक्काबुक्की, मारहाण आणि तोडफोड

तरुण-तरुणी प्रेमविवाह करुन पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीयांसह त्यांचे नातेवाईक आणि समर्थक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये तरुण-तरुणीच्या निर्णयावरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच संताप अनावर झाल्याने दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांवर धावून गेल्या आणि हाणामारी सुरू झाली. वाद चिघळताच पोलीस ठाणे परिसरात धावाधाव सुरू झाली. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. या गोंधळात पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस ठाण्यात उपस्थित नागरिकांमध्येही घबराट पसरली.

राजकीय गटांमुळे वाढला तणाव

या घटनेत एका विद्यमान नगरसेवकाशी संबंधित गट आणि एका माजी जिल्हा परिषद सदस्याशी संबंधित गट समोरासमोर आल्याने वाद अधिकच चिघळल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि बाचाबाची झाल्याने तणाव आणखी वाढला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही गटांना वेगळे करण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आली.

प्रेमविवाह करणारे तरुण-तरुणी सज्ञान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमविवाह केलेले तरुण आणि तरुणी हे दोघेही सज्ञान असून त्यांनी स्वतःच्या इच्छेने विवाह केला आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. घटनेदरम्यान झालेल्या तोडफोडीमुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यात आले असून गोंधळ, मारहाण आणि तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.