ग्रामसचिवाकडून महिलेचा विनयभंग

0
7

सावली,दि.15ः-येथून जवळच असलेल्या साखरी ग्रामपंचायत येथे ग्रामसचिवाकडून महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली. किशोर माधवराव गणवीर(५६) रा. सावली असे आरोपीचे नाव असून सदर आरोपी हा ग्रा.पं. साखरी येथे सात महिन्यांपासून ग्रामसचिव या पदावर कार्यरत होता.
फिर्यादी महिलेचा पती हा २५ वर्षापूर्वी मृत्यू पावला होता. फिर्यादी महिला ही कुटूंबप्रमुख असल्याने ती जिबगांव येथे वास्तव्यास होती. तिला एक मुलगा असल्याने व त्याला दोन मुली असल्यामुळे त्यांना शासनाकडून सुकन्या योजनेकरिता डोमेशियलची आवश्यकता होती. व पतीच्या नावे असलेला जन्मतारखेच्या दाखल्याची तिला आवश्यकता असल्याने ती कागदपत्राच्या जुळवाजुळवीकरिता गेल्या आठ दिवसापासून पायपिट करीत होती. साखरी ग्रामपंचायतीकडून तिला मृतक पतीच्या जन्माच्या दाखल्याची गरज असल्याने तिला तो दाखला मिळावा म्हणून ग्रामपंचायतीला रितसर अर्ज केला होता.
शनिवार १३ जानेवारी रोजी शासकिय सुटी असतांना ग्रामसचिवाने दाखला देण्याच्या बहाण्याने फिर्यादी महिलेला बोलावून व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणीही कर्मचारी नसल्याचा मोका साधून महिलेचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील महिला व गावकरी धावून आले. व तंटामुक्ती अध्यक्षांनी पोलिसांना पाचारण केले. नंतर घटनास्थळी ग्रामसचिवाला पोलिसांनी अटक केली व महिलेच्या तक्रारीवरून सावली पोलिस स्टेशन येथे ग्रामसचिवाविरुद्ध कलम ३५४ व ३५४(अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात सावली पोलिस तपास करीत आहे