सिलिंडर रिफिलिंगच्या अवैध कारखान्यावर धाड

0
12

नागपूर,दि.05 : विविध कंपन्यांच्या मोठ्या सिलिंडरमधून धोकादायक पद्धतीने वायू (गॅस) काढून ती छोट्या सिलिंडरमध्ये भरणाऱ्या हिंगण्यातील एका अवैध सिलिंडर रिफिलिंग कारखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा घातला. येथून छोटी-मोठी २९५ सिलिंडर तसेच गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त करून एका आरोपीला अटक केली. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे हिंगणा- एमआयडीसीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
क्रिष्णकांत वशिष्ठ कुंवर (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो हिंगणा मार्गावरील काळमेघनगरात राहतो. त्याचे भारत ट्रेडिंग कंपनी नावाने दुकान आहे. तो स्वत:ला गो-गॅस कंपनी हिंगणा विभागाचा वितरक असल्याचे सांगतो. बाजूलाच त्याचे गोदाम आहे. या गोदामात तो विविध कंपन्यांच्या सिलिंडरमध्ये गॅस पाईप आणि अ‍ॅडॉप्टरच्या माध्यमातून छोट्या (दिल्ली मेड) सिलिंडरमध्ये गॅस भरतो आणि त्याची अवैध विक्री करतो, अशी माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
त्यावरून ठाणेदार सुनील महाडिक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पी. सयाम, गिरीधर ठवरे, हवलदार विजय नेमाडे, श्यामनारायण ठाकूर, नायक मंगेश गवई अणि अभिजित यांनी शनिवारी रात्री ७ च्या सुमारास कुंवरच्या गोदाम कम कारखान्यावर छापा घातला. त्यावेळी आरोपी मोठ्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर याच्याकडून गो गॅसचे ७१, भारत गॅसचे २४ आणि दिल्लीमेड (छोटे) २०० असे एकूण २९५सिलिंडर पोलिसांनी जप्त केले.