26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home गुन्हेवार्ता तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा वनमजूर एसीबीच्या जाळ्यात

तीनशे रुपयांची लाच स्वीकारणारा वनमजूर एसीबीच्या जाळ्यात

0
26

गडचिरोली, दि.09: सागवान पलंगाची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना देण्याकरिता तक्रारकर्त्याकडून केवळ तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथील उपक्षेत्र वनविभाग कार्यालयातील वनमजूर प्रभाकर जैराम निमजे यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा शिक्षण घेत असून, रोजंदारीचे काम करतो. त्याने आपल्या वैयक्तिक बचतीतून दोन वर्षांपूर्वी सागवान लाकडाचे दिवाण खरेदी केले होते. ते दिवाण स्वगावी नेण्यासाठी त्याला वाहतूक परवाना आवश्यक होता. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील उपक्षेत्र वनविभाग कार्यालयाकडे रितसर अर्ज केला होता. परंतु वनमजूर प्रभाकर निमजे याने त्यास वाहतूक परवाना मिळवून देण्यासाठी ३०० रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज उपक्षेत्र वनविभाग कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रभाकर निमजे यास तक्रारकर्त्याकडून ३०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, १३(१)(ड), सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.एसीबीचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील , पोलिस उपअधीक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सुधाकर दंडिकवार, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, सोनल आत्राम, सोनी तावाडे, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.