लैंगिक छळ करणार्‍या मुक्तीपथच्या तालुका संघटकास अटक

0
12

गडचिरोली,दि.06ः- मुक्तीपथ संघटनेच्या कामाच्या बहाण्याने बोलावून एकटपेणाचा फायदा घेऊन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या चामोर्शी येथील मुक्तीपथ संघटनेच्या तालुका संघटकास पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गोविंद वखरे (२७) सध्या रा. हनुमान वॉर्ड चामोर्शी असे आरोपीचे नाव आहे. संदिप वखरे हा मुळचा मु. पो. झिरपी, ता. अंबड, जि. जालना येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आरोपी संदीप वखरे याने मुक्तीपथ संघटनेच्या कामाच्या बहाण्याने पीडित मुलीस बोलाविले. त्याने पीडितेला एकटेपणाचा फायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधून तिचा हात धरून तिला शरीरसुखाची मागणी केली. तसेच पीडितेच्या मैत्रिणीशीसुद्धा जवळीक साधून तिचाही हात पकडून मैत्रिणीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला व दुसर्‍या मैत्रिणीला प्रेमाची भाषा बोलून दोघींच्याही मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून मुलींचा लैंगिक छळ केल्याची तक्रार पीडितेने ३0 ऑगस्ट रोजी चामोर्शी पोलिस ठाण्यात केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अप. क्र. २४७/२0१८ कलम ३५४ (अ) (१) (२) (४) भादंवि, सह कलम १२ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २0१२, सह कलम ३ (१) (डब्ल्यू) (आय), ३ (२) (अ) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी संदीप वखरे याला आज ५ सप्टेंबर रोजी अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे करीत आहेत.