नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या कुटुुंबातील वारसदाराला मिळणार नोकरी

0
6
file photo

गडचिरोली,दि.06 : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील निष्पाप नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या कुटुंबातील निर्धारीत एका वारसदाराला शासन सेवेतील वर्ग ३ व ४ ची थेट नोकरी मिळणार आहे. यासाठी विशेष बाब म्हणून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी असे दिशानिर्देश दिले.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णयान्वये पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे २६ जून २०१८ रोजी नक्षल पीडित प्रमाणपत्र मेळावा आयोजित करण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्याच्या सिमावर्ती भाग असलेल्या घनदाट जंगलाचा आसरा घेत नक्षलवाद चळवळ कार्यरत असून नक्षलवादी विकासाला बाधा निर्माण करीत आहेत. चळवळीची दहशत कायम टिकवून ठेवण्यासाठी नक्षलवादी निष्पाप नागरिकांच्या हत्या करीत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या मृतकाचे कुटुंब आर्थिक कचाट्यात सापडत आहेत. अशा कुटुंबातील एका वारसदाराला शासकीय सेवेतील वर्ग ३ व ४ च्या पदावर थेट नोकरी देवून त्यांचे जीवनमान उंचाविण्याचा हितावह निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. दरम्यान, १५० ते १६० कुटुंबातील २५० ते ३०० व्यक्तींनी वारसान प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुट्या असल्याने पीडित कुटुंबातील वारसांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात १५ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. .