तोतया सीबीआय अधिकारी गजाआड

0
7

भंडारा,दि.27ः- सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष देत अनेक बेरोजगारांची फसवणूक करणार्‍या भामट्यास अटक करण्यात आली आहे. देवराव बाबूराव बावणे असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून बनावट सीबीआय ओळखपत्र, पोलिस गणवेश, ५ एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. जवाहरनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
अनेक बेरोजगारांना लाखोंच्या गंडा घातल्याची कबुली आरोपीने दिली आहे. २0१७ मध्ये आरोपीने सीबीआय अधिकारी असून आपल्याला घर भाड्याने हवे आहे, असे सांगत भाड्याने घर मिळवून घेतले. घरमालकाची ओळख होताच सीबीआय अधिकारी असल्याने एनटीपीसी मौदा येथे वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगली ओळख आहे, असे आरोपीने तक्रारदाराला सांगितले. तिथे तुमच्या मुलाला नोकरी लावून देईन, असे आश्‍वासन देत ८0 हजार रुपये मागितले. दरम्यान तक्रारदार व त्यांचा मुलागा मौदाच्या एनटीपीसी गेट समोर गेले. तक्रारदार आणि मुलास गेटसमोर बसवून आरोपी तेथून फरार झाला. बर्‍याच कालावधीनंतर आरोपी न आल्याने तक्रारदाराने एनटीपीसीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर तक्रारदाराने जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्द तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले असता, मोबाईल लोकेशनवरून आरोपी हा रामटेकला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ रामटेक येथे जाऊन आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू आहे.नोकरी लावून देण्याकरिता कोणालाही पैसे न देण्याचे आवाहन भंडारा पोलिसांनी केले आहे.