माकडे मोहल्ला परिसरात तरुणाचा निर्घृण खून

0
7

भंडारा, दि.१३-शहरातील माकडे मोहल्ला परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन उराडे (वय २४) रा. माकडे मोहल्ला, भंडारा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचाच मित्र असलेल्या आरोपी सतीश बागडे ऊर्फ पोएट (वय २३) रा. बेला याला अटक करण्यात आली आहे.
रविवारी रात्री १0.३0 वाजता नितीनच्या घरी नितीन व सतीश या दोघांनी मद्यप्राशन करून जेवण केले. जेवण झाल्यानंतर हे दोघेही बाहेर फिरायला गेले. याच दरम्यान दोघांत पैशाच्या व्यवहारावरून ेबाचाबाची झाली. यात सतीशने नितीनच्या गळ्यावर व पोटावर
गुप्तीने सपासप वार करून त्याचा खून केला. नितीनचा मृतदेह रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. पहाटे फिरण्यासाठी निघालेल्या परिसरातील नागरिकांना नितीनचा मृतदेह आढळून आला. ही घटना पसरताच बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळी जमली होती. घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस पथक
घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
मृताच्या भावाने रात्री आपल्या भावासोबत असलेल्या सतीशवर खुनाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सतीश बागडे याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. परंतु, त्याच्याशिवाय या खुनात आणखी कुणाचा सहभाग आहे. याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपीस अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.
मृत नितीन व सतीश या दोघांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याने पैशाच्या व्यवहारावरून हे हे हत्याकांड घडले असावे की आणखी काही, अशी चर्चा आहे. भरवस्तीत झालेल्या खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ व भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.