पोलिस दलातर्फे पुरसलगोंदी येथे अनोखी दिवाळी भेट

0
10

गडचिरोली,दि.१३- जिल्हा पोलिस दलाच्यावतीने जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मनोरंजनासह जगातील, देशातील घडामोडींची माहिती व्हावी, दुर्गम भागातील नागरिकांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे तसेच नागरिकांचा पोलिस विभागाबद्दल जनतेत विश्‍वास वाढावा याकरीता जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्याच्या पोलिस प्रशासनाची सुत्रे हाती घेतल्यानंतर वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
सदर उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १८0 किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशिल, अतीदुर्गम, नक्षल प्रभावीत पुरसलगोंदी येथे पोलिस विभागाच्यावतीने ४0 इंची कलर एलईडी टीव्ही, टाटा स्कॉय, डिश संच गोटूल भवनात लावण्यात आले. यावेळी गावकर्‍यांना दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. लावण्यात आलेल्या टीव्हीचा मनोरंजनासह गावकर्‍यांचा तसेच विद्यार्थ्यांचा विकास साध्य करण्याकरीता उपयोग करून नक्षल्यांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अतीदुर्गम अशा पुरसलगोंदी गावात मनोरंजनाची सुविधा करण्यासाठी हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, माहूरकर, मोरे, कर्मचारी यांनी सहकार्य केले.