विषारी औषधामुळे २ सख्ख्या भावांचा मृत्यू; भोंदू डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

0
16

नांदेड,दि.07ः – दारू सोडवण्यासाठी आलेल्या २ सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. हदगाव शहरातील एका भोंदू डॉक्टरकडे ते दारू साोडवायला आले होते. मात्र, त्या डॉक्टरने दिलेल्या विषारी औषधामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास घडली असली, तरी रात्री उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी संजय ज्ञानदेव मुंडे (वय ४०) आणि विजय ज्ञानदेव मुंडे (वय ३५, रा. तळेगाव, ता. परळी, जि. बीड) हे २ सख्खे भाऊ हदगावमधील एका खासगी डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आले. त्यांना डॉक्टर रविंद्र पोधाडे यांनी पिण्यासाठी औषध दिले. ते औषध घेवून ते परतीच्या प्रवासाला लागले. अंदाजे ३० किलोमीटर जाताच पोटात आग होते व जीव कासावीस करतो, अशी तक्रार संजय मुंडे यांनी केली. त्यावर त्यांना पिण्याचे पाणी देण्यात आले. त्यानंतर ते दोघे झोपले.
संबंधितांपैकी एकाला नांदेडला पोहचल्यावर उठवण्याचा प्रयत्न केला असता, तो उठत नसल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर ५० किलोमीटर गेल्यावर दुसरा रुग्ण विजय मुंडे यालाही त्रास जाणवू लागल्याने त्याला लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे त्याचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नांदेड येथून त्यांच्या मृत्यूची माहिती कळल्यानंतर गावाकडील नातेवाईकांनी धाव घेत लोहा गाठले. त्यांनी भ्रमणध्वणीद्वारे हदगाव पोलीस ठाण्यात माहिती सांगितली व दोघांचे मृतदेह घेवून हदगाव पोलीस ठाणे गाठले. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. मृतदेह शवागृहात ठेवून पोलिसांनी डॉ. रविंद्र पोधाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.