डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय: विनोद अग्रवाल

0
28

गोंदिया,दि.07ः- भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. असे प्रतिपादन माजी जि . प. उपाध्यक्ष तसेच माजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष साजरी विनोद अग्रवाल यांनी केले. गोंदियातील स्थानिक आंबेडकर चौकात परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करताना ते बोलत होते.यावेऴी भाजप शहर अध्यक्ष सुनील केलंनका, श्रावण बाळ समिती चे तालुकाध्यक्ष भाऊराव उके,हंसू वासनिक आणि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. असे मत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केले.