पैनगंगा नदीवर उच्च प्रतीचे बंधारे उभारून नदीकाठावरील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा

0
25

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे भागवत देवसरकर यांचे साकडे
नांदेड दि. 7 -इसापूर धरणापासून पुढे साखळी पद्धतीने उच्च प्रतीचे बंधारे पैनगंगा नदीवर उभारून हदगाव, उमरखेड, हिमायतनगर, किनवट, माहूर तालुक्यातील शेकडो गावातील पिण्याची व सिचंनासाठी लागणाऱ्या पाण्याची कायमची समस्या सोडवावी, अशी आग्रही मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून कमी पावसामुळे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले शेकडो गावातील पिण्याच्या व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, सप्टेंबर महिन्यात नदीचे पात्र कोरडेठक पडत आहे, पावसाळ्यात पडलेले पाणी बंधारे बांधले गेले नसल्यामुळे पूर्णपणे वाहून जात आहे, पावसाळा संपला की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. यावर लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. इसापूर धरणापासून पुढे साखळी पद्धतीने 20 कि.मी. अंतरावर पांगरा येथे हदगाव तालुक्यात 46 कि.मी.वर गोजेगाव, दुसरा 68 कि.मी. अंतरावर बनचिंचोली, हिमायतनगर तालुक्यात 100 कि.मी.वर घारापूर असे उच्च प्रतीचे बंधारे उभारण्यासाठीचा जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास जलसंपदा विभागाच्या वतीने मान्यता मिळाली तर पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले शेकडो गावातील लोकांचा पिण्याचा व हजारो हेक्टर क्षेत्रवरील जमिनीच्या सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. साखळी पद्धतीने बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी बंधाऱ्यात साचून नदीत पाण्याची पातळी वाढेल व बारमाही पाणीसाठा उपलब्ध राहील, नदी काठावरील शेकडो गावातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन त्याचा फायदा चारही तालुक्यातील शेकडो गावातील शेतकऱ्यांना होईल, काठावरील गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील मिटेल, यासाठीच मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जलंसपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन नदीवरील उच्च प्रतीचे साखळी बंधाऱ्याच्या उभारणीच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली, याबाबत लवकर सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले असल्याचे भागवत देवसरकर यांनी सांगितले.