25 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home गुन्हेवार्ता महिला नक्षली पार्वती ऊर्फ सुशीला सडमेकला गडचिरोली पोलिसांकडून अटक

महिला नक्षली पार्वती ऊर्फ सुशीला सडमेकला गडचिरोली पोलिसांकडून अटक

0
34

गडचिरोली,दि.07 :नक्षलवाद्यांच्या भामरागड एरीया कमिटीची सदस्य असलेली पार्वती ऊर्फ सुशीला शंकर सडमेक हिला शुक्रवारला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी आज(दि.07)एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.तिच्यावर सहा लाखाचे बक्षिस होेते.नियमानुसार अटक करणारे पोलिस पथक तिच्यावरील बक्षिसाचे मानकरी ठरणार आहेत.

पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर केलेली अटक हे गडचिरोली पोलिसांचे यश मानले जात आहे.पार्वती ऊर्फ सुशीला ताडगाव पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या मडवेली गावची रहिवासी असून ती नक्षली बिच्छूची पत्नी आहे. 2006 पासून ती बाल नक्षली म्हणून दलम मध्ये सहभागी झाली होती.2008 ते 10 पर्यंत नर्मदाक्काची अंगरक्षक होती. 2010 ते 12 पर्यंत जांबिया गट्टा दलममध्ये कमांडो रामको सोबत महिला संघटनेचे काम पाहत होती. 2012 ते 2014 मध्ये की भामरागड एलओसीची उपकमांडर म्हणून कार्यरत होती. तर सद्यस्थितीत एरिया कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती.गडचिरोली पोलिसांनी शुक्रवारी तिला अटक केली असून, भामरागड पोलीस स्टेशन येथे भामरागड तालुक्यातील नैनवाडी निवासी डूंगा कोमटी मडावी यांच्या हत्येच्या आरोपावरून गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पार्वतीवर पोलिसांनी सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिचेवर जिल्ह्यात 24 हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.