जिल्ह्यात अपघातात तिघांचा मृत्यू

0
16
सालेकसा,दि.30ः– सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत आज सकाळच्या सुमारास ट्रकच्या चाकातील हवा बघण्यासाठी उतरलेल्या ट्रकचालकाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आमगाव खुर्द येथे धुके मोठ्या प्रमाणात असल्याने गाडी जागीच उभी करुन टायरमध्ये हवा बघण्याच्या दृष्टीने ट्रक खाली उतरून हवा तपासणी करत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने टक्कर दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाचे नाव लखन सिंग अमरसिंग धाकड वय 40 राहणार खजुराहो मध्य प्रदेश असून एमएच 40 एके 5120 या ट्रकचा चालक होता. ट्रक काही साहित्य घेऊन नागपूरकडे निघालेला होत होता. ठाणेदार राजकुमार डुनगे यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रकरणाचा तपास संतोष चुटे यांनी केला.
निमगावजवळी दुचाकीस्वार ठार
अर्जुनी मोर-बोंडगाव देवी मार्गावरील निमगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या ट्रकला मागेहुन भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना 30 डिसेंबर ला सायं. 6:30 च्या दरम्यान घडली.मृतामध्ये देवानंद देवराम मेश्राम (वय 21,रा.ईसापुर),समीर अरुण मेश्राम (वय 19,रा.नान्होरी/ दिघोरी)असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोर तालुक्यातील ईसापुर येथील देवानंद मेश्राम हा आपला नातेवाईक समीर मेश्रामला नान्होरी दिघोरी येथे एम.एच.36 – जे.1863 या दुचाकीने पोहचवून देण्यासाठी निघाला असता सिमेंटने भरलेला ट्रक(सि.जी.04 -जे.सी.2263)रस्त्याच्या कडेला उभा असतांना धडक दिली.पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरला पाठविले. अधिक तपास पो.नी.महादेव तोदले यांचे मार्गदर्शनात अर्जुनी मोर पोलीस करीत आहेत.