आठ सागवान चोरटे वनविभागाच्या ताब्यात

0
15

सालेकसा,दि.31ः-सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत कक्ष क्र. ४३७ जवळील टेंभूटोला गावाजवळ २७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सागवान लाकडे अवैधरित्या वाहून नेणार्‍या आठ आरोपींना सालेकसा वनविभागाने ताब्यात घेतले. टेंभूटोला गावाजवळून सागवान लाकडे अवैधरित्या वाहून नेत असल्याची गुप्त माहिती सालेकसा वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सालेकसाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. एच. भगारी, वनपाल टी. एम. घासले, वनरक्षक जी. एम. भगत, के. जी. सूर्यवंशी, अतिरिक्त वनपाल सी. व्ही. ढोमणे, वनमजूर जे.आर. रहांगडाले व आर. व्ही. तुपटे यांनी कक्ष क्र. ४३७ हद्दीतील टेंभूटोला गावाजवळ नाकाबंदी केली. यावेळी नऊ आरोपी डोक्यावर सागवान लाकडे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, वन अधिकारी व कर्मचार्‍यांना पाहताच त्यांनी लाकडे फेकून पळ काढला. तर पाठलागादरम्यान केवल रामचंद्र धुर्वे याला ताब्यात घेतले तर इतर फरार झाले. कर्मचार्‍यांनी घटनास्थळावरुन पाच सागवान लाकडे जप्त करुन वनपरिक्षेत्राधिकारी इलमकर यांच्या मार्गदर्शनात सालेकसा विक्री आगारात पाठविण्यात आला. दरम्यान, ताब्यात असलेल्या आरोपीच्या चौकशीवरुन, २८ डिसेंबर रोजी या घटनेतील भुगेश् सिताराम दमाहे, जगतराम नत्थू भुरकुडे, प्रकाश चमरुलाल भौतिक, नंदलाल छोटेलाल यादव, नोहरलाल चैतराम भलावी, जितेंद्र महेश नागपुरे व राधेश्याम चैतरम भलावी या आरोपींना अटक करण्यात आली. तर फरार आरोपी रेवा शेषराम नागपुरे याचा शोध चालू आहे.