केशोरी आरोग्य केंद्राला कायाकल्प,भानपूर व दल्लीला आनंदीबाई गौरव पुरस्कार

0
15

गोंदिया,दि.31ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे (दि.३0)डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व कायाकल्प कार्यक्रमातंर्गत सन २0१८-१९ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यातंर्गत केशोरी आरोग्य केंद्राला २ लाखाचा कायाकल्प पुरस्कार, भानपूर आरोग्य केंद्र व दल्ली उपकेंद्राला डॉ.आनंदीबाई जोशी गौरव प्रथम पुरस्कार तर तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला.
गोंदिया जिल्हा हा अतिमागास व आदिवासीबहूल असून आरोग्य सेवेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचली असली तरी, अनेक कारणांमुळे प्रसंगी रुग्णाना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना नियमीत व वेळेत आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. आरोग्यसेवा पुरविणार्‍या अधिकरी व कर्मचार्‍यांना उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळवे व ही यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्यरत राहावी, यासाठी शासनाव्दारे डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार व कायाकल्प योजनेअतंर्गत पुरस्कार देण्यात येतो. यातंर्गत यंदा आदिवासीबहूल व नक्षलदृष्ट्या संवेदनशील अशा आरोग्य केंद्र व उपकेंद्र पुरस्कारास पात्र ठरल्या आहेत. ही बाब निश्‍चितच जिल्ह्याच्या आरोग्यसेवा देणार्‍या संस्थांसाठी प्रेरणादायी आहे. जिपच्या सभागृहात जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिप अध्यक्षा सीमा मडावी होत्या. या वेळी उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जिप आरोग्य सभपती रमेश अंबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. ई. ए. हाश्मी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिप महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जिप सदस्य तेजुकला गहाणे, लोणारे, पंधरे, सहाय्यक जिल्हा चिकित्सक डॉ. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्रातंर्गत डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दल्लीला प्रथम पुरस्कार, व्दितीय लाखेगाव व तृतीय पुरस्कार फुलचूर आरोग्य उपकेंद्राला प्रदान करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत प्रथम भानपूर, व्दितीय केशोरी व तृतीय शेंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आले.
तसेच उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. शासनाच्या कायाकल्प कार्यक्रमातंर्गत केशोरी प्राथमिक केंद्राला २ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर प्रोत्साहन पुरस्कार चोपा, महागाव, ठाणा, सोनी, काटी, मुल्ला, शेंडा, कालीमाटी यांना प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. निमगडे यांनी केले. संचालन डॉ. वीना वट्टी व डॉ. सपना खंडाईत यांनी केले. तर आभार डॉ. एन. जी. अग्रवाल यांनी मानले. आयोजनासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, डॉ. स्वर्णरेखा उपाध्याय, ज्योती समरकर तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचार्‍यांनी पर्शिम घेतले.